सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर वाई तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क झाले असून विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पसरणी घाटात बांधकाम विभागाची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक असलेल्या तब्बल 19 होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. पसरणी घाट ते पाचगणी पर्यंतचे घाटातील बेकायदा उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंग्स विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग आक्रमक झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गट आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक घेत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी आपआपल्या तालुकयातील घटना मार्गावर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर हार्डिंग्जची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, गुरुवार, दि. 30 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते महेश गोजरी यांच्या मार्गदर्शनाखाली पसरणी घाटातील अनेक वळणावर रस्त्याच्या कडेला उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे बेकायदा होर्डिंग उभारणी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याचबरोबर घाटातील 20 बेकायदा होर्डिंग असून बांधकाम विभागाची ही कारवाई दोन दिवस राबवण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसायिकांनी जाहिरातीचे फ्लेक्स स्वतःहून काढून घ्यावेत, अन्यथा प्रशासनाकडून दण्डात्मक कारवाई करून फ्लेक्स काढून घेतले जातील, असा इशारा बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.