घाटाईदेवी मार्गावरील चरी, खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पर्यटकांकडून येथील नजारा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली जात आहे. कास बंगला ते कास गाव हद्दीत असलेली फॉरेस्ट चौकी अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून कास गाव आणि बामणोलीची वाहतूक कासाणी घाटाईमार्गे मागील पंधरवड्यात वळविण्यात आली. मात्र, या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडून पाणी साचून चिखल निर्माण झाला असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

कास गाव आणि बामणोली मार्गावर पाचशे मीटर दगड, मातीचा कच्चा रस्ता असून, मोठ्या प्रमाणावर चरी आणि खड्यामुळे मागील आठवड्यात काळी खडी टाकून प्रशासनाकडून काम करण्यात आले. या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी २ एसटी बस आणि डंपर अडकला होता. त्यामुळे वाहतूक काहीकाळ थांबविण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर एसटी बस बाहेर काढून मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरु करण्यात आला होता.

या मार्गावर असलेल्या मोरीच्या मध्यभागीच भगदाड पडल्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक दोन तासाहून अधिक काळ थांबविण्यात आली होती. या भगदाडामुळे वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच रस्ताही धोकादायक बनला होता.