मुनावळे जलपर्यटनसाठी राज्य शासनाकडून पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुका असलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलपर्यटनासाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद केली आहे. या पर्यटन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे. पाण्यातील देशातील सर्वात मोठा जलपर्यटन प्रकल्प मुनावळे याठिकाणी उभारण्यात येत आहे.

मुनावळे जलपर्यटनासाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात नुकतीच 53 कोटी 22 लाखांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा जलपर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्यावर्षी सुरू झाले. या प्रकल्पात पर्यटकांना विविध प्रकारच्या बोटी चालवण्याचा व त्यामधून कोयना जलाशयात विहार करण्याचा आनंद घेता येणार आहे. साहसी पर्यटनाचा थरारक अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

सर्वसामान्य पर्यटकापासून श्रीमंत पर्यटकापर्यंत सर्वांचाच विचारकेलेला हा आगळावेगळा पर्यटन प्रकल्प आहे. देशभरात जलपर्यटनांचा अभ्यास करून अत्यंत विचारपूर्वक बनवलेल्या या पर्यटन प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे हा निधी आता उपलब्ध होणार आहे. पर्यटनासाठी मूलभूत पायाभूत सुविधाही दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिकांसह जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सातारा तसेच जावली तालुक्याच्या विकासात मोठी भर घालणारा हा प्रकल्प वर्षभरात पूर्णत्वास नेला जाणार आहे.

सातारा – जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना आ. शिवेंद्रराजे भोसले व तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली होती. त्यांच्यासमोर या पर्यटन प्रकल्पाचे दोनवर्षांपूर्वी सादरीकरण झाले होते. त्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला होता. या प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचेही प्रयत्न महत्त्वाचे ठरले.