टोल प्रश्नी पृथ्वीराज चव्हाण आक्रमक; कराडच्या तासवडे टोलनाक्यावर 3 तारखेला करणार आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर महामार्ग रुंदीकणाचे काम सुरु असून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे प्रवासाला वेळ लागत आहे. असे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात असल्याने जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी, दि. 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात तासवडे येथील टोलनाक्यावर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टोल विरोधी आंदोलनासंदर्भात माहिती दिली. पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने आणि दुरावस्था झाली आहे. काँग्रेसने याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात टोल विरोधी आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते आ. सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम , काँग्रेस नेते आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, आ. विक्रम सावंत यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण आणि आ. विश्वजीत कदम, उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराडमधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होतील. सातारा जवळच्या आनेवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजित देशमुख, राजेंद्र शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा या तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सहभागी होतील. पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते आ.संग्राम थोपटे आ. संग्राम जगताप यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.

घोडेबाजार करणाऱ्या लोकांना…

घोडेबाजार करणाऱ्या लोकांना, विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शिक्षा करायची का बक्षीस द्यायचे हे आता लोकांनाच ठरवावे लागेल. महाराष्ट्रातील सत्तांतर हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने झाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी हा देश कुठे आणून ठेवला आहे? असा सवालही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी…

माजी गृहमंत्र्यांनी विद्यमान गृहमंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्राची परिस्थिती शरमेने मान खाली घालावी अशी झाली आहे. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर न बोललेलेच बरे असे, मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.