कराड प्रतिनिधी | बदलापूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कराड येथील परिवर्तन संघटनेच्या वतीने नुकताच कराडात मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. नेहा सुरेश दुबे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्रफ खान, राष्ट्रीय सरचिटणीस महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन संघटना सातारा जिल्हा मंगेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मूकमोर्चास उपाध्यक्ष जीवन सागरे, सरचिटणीस पृथ्वीराज लादे, सचिव दस्तकीर शेख, कराड तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत गोतपागर, उपाध्यक्ष प्रफुल गोखले, सरचिटणीस संदीप सावंत, सचिव अमोल जमदाडे उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला हार घालून मुक मोर्चास सुरुवात केली. डॉ.आंबेडकर पुतळ्यापासून ते तहसीलदार कार्यालय कराड पर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.