कराड प्रतिनिधी | जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद शनिवारी कराड येथे उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी कराडच्या दत्त चौकात निषेध नोंदविण्यात आला. 15 सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी दत्त चौकात मराठा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने एकत्रित आल्या. त्यांनी चौकात रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजबांधवांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा, संबंधित लोकांवर कारवाई न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
जालन्याच्या लाठीचार्ज घटनेचा कराडात मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध pic.twitter.com/gpsa8Ov7mR
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 2, 2023
अंतरवेली (जालना) येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्य सरकारविरोधात मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. याचे पडसाद आज सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी उमटले. कराड येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दत्त चौकात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पोलिसांना निवेदन देत संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.