सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळीतील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांच्या मूक मोर्चाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी या संघटनांच्या प्रतिनिधींनी तोंडाला काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच निवासी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी 2 ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही झाली नाही तर त्याच दिवशी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक संघटनानी दिला.
साताऱ्यात पुसेसावळीतील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आज मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने जिल्हा प्रशासनाने मोर्चास परवानगी नाकारली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासमवेतच्या बैठकीत मूक मोर्चा रद्द करण्याचा निर्णय झाला. मात्र, संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमा झाले.
विविध सामाजिक संघटना व सर्व पक्षांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले की, पुसेसावळीत घडलेल्या घटनेची सत्यशोधन समितीची नेमणूक करुन चौकशी करावी. अल्पसंखयांक समाजाविषयी सातत्याने गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करुन मुस्लिम समाजाविरोधात भडकावू वातावरण करणारा सूत्रधार विक्रम पावसकर यांना अटक करावी.
हिंसाचारात बळी पडलेल्या तरुणाचया कुटुंबाला २५ लाख रुपये भरपाई मिळावी, पंचनामे व जबाब दबावाखाली झालेले असल्याने ते आम्हाला मान्य नसून फेर पंचनामेकरावेत. मागील सहा महिन्यात जिल्हयात प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर करण्याच्या घटनांची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी दोन ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली असून त्यावर कार्यवाही झाली नाही तर त्याच दिवशी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनानी दिला आहे.