सातारा प्रतिनिधी । सध्या रेल्वेच्या दुहेरीकरणावेळी करण्यात येणारी रेल्वे लाईनची काठी ठिकाणची कामे शेतकऱ्यांना त्रास देणारी ठरत आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडून आंदोलने देखील केली जात आहेत. अशीच घटना आज कोरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर गाव परिसरात घडली. या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असून या ठिकाणी रस्ता चांगला करु द्यावा, अशी मागणी करून देखील त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने यावरून आक्रमक होत बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनी आज रेल्वे मार्गावर आंदोलन केले.
बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनि यापूर्वी रेल्वे क्रॉसिंग अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने याबावर उपाय करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनास निवेदने देखील दिली. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले गेले नाही. परिणामी या यादोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंग अंडरपास मध्ये मागील सहा महिने पाणी साठत असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरी देखील रेल्वे प्रशासनाने सोयी सुविधांचा अभाव असताना हे काम सुरू ठेवले.
परिणामी बीचुकले आणि देऊर येथील ग्रामस्थ अजूनच आक्रमक झाले. आज त्यांनी रेल्वे मार्गावर उभे राहत आंदोलन केले. यावेळी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली. आंदाेलकांनी रेल्वे क्रॉसिंग मध्ये रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांनी जीव मुठीत धरून रेल्वे रूळ ओलांडावा लागत असल्याचे सांगितले. यावर तातडीने ताेडगा काढावा, अशी मागणी आंदाेलक ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली.