सातारा प्रतिनिधी | भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. त्याचे पडसाद साताऱ्यात देखील उमटले. साताऱ्यात पोवई नाक्यावर भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुलुंडचे नगरसेवक विनोद कांबळे,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, सुनील काळेकर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सचिन भोसले,रवी आपटे प्रवीण शहाणे, प्रदेश महिला मोर्चा चिटणीस सुनीशा शहा, वैशाली टंकसाळे, कुंजा खंदारे, संगीता जाधव, रोहिणी क्षीरसागर,अश्विनी हुबळीकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचे पाप आव्हाड यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोक स्वत:ला पुरोगामी समजत असताना त्यांच्या हातून अशी घटना घडणे योग्य नाही. यातूनच आज त्यांचा खरा चेहरा पुढे आला आहे.’ याशिवाय ‘ते ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडून असे काम होऊन समाजात वेगळा संदेश देण्याचे काम झाले आहे. त्यांच्यावर शासनाचे कडक कारवाई,’ अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली आहे. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते. त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले. मी याबद्दल जाहीर माफी मागतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.