सातारा प्रतिनिधी | आशा व गटप्रवर्तकांना मानधन वाढ आणि 2 हजार रुपये दिवाळी बोनस करण्याचे आश्वासन देऊन 2 महिने हाेऊनही याबाबतचा शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे शेकडो आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील अंगणवाडीच्या आशा आणि गटप्रवर्तकांनी मानधन वाढ आणि भाऊबीज बोनस देण्याच्या मागणीसाठी २४ दिवसांचा संप केला होता. याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये मानधन जाहीर केले. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशांना 7 हजार रुपये व प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, या घटनेस दोन महिने होऊन गेले तरी शासनाकडून अध्यादेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने वाढीव मानधन आणि दिवाळी बोनसचा शासन निर्णय करण्यात यावा, अशी मागणी करत आशा व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले.
यावेळी शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावर सीमा भोसले, जयश्री काळभोर, कल्याणी मराठे, पुष्पा मसणे, विद्या कांबळे, नसिमा मुलाणी, सुवर्णा पाटील, रुपाली पवार आदींच्या सह्या आहेत.