सातारा प्रतिनिधी । गेल्या 10 वर्षांपासून सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या 36 प्राथमिक शिक्षकांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. या शिक्षकांना जाग्यावरच नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रियेसाठी जिह्यातील 54 प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी 14 शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारण्यास नकार दिला. 36 शिक्षकांनी पदोन्नती स्कीकारली. त्यामुळे हे 36 शिक्षक आता शिक्षण विस्तार अधिकारी झाले आहेत. तर सेकानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या चार पदांवर प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना पदोन्नतीची संधी देण्यात आली. यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, अधीक्षक हेमंत खाडे, विस्तार अधिकारी गजानन आडे, अधीक्षक प्रवीण सावंत, कक्ष अधिकारी दयानंद सावंत यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली.
निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर जाग्यावरच पदोन्नती स्कीकारणाऱ्या शिक्षकांना नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नतीचा विषय मार्गी लावल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे शिक्षक संघटनांनी अभिनंदन केले.