सातारा प्रतिनिधी | ओबीसी आरक्षण उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा या ठिकाणी भेट दिली. तसेच फुले दाम्पत्याला अभिवादन केले. यावेळी ‘आमचे हक्क, अधिकार टिकले पाहिजेत. ओबीसीचे पंचायत राज आरक्षण, शिक्षण नोकरीचे आरक्षण टिकले पाहिजे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भातील जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ओबीसी बांधवांशी संवाद साधत आणि अठरा पगड जातींतील लोकांना एकत्र करून सर्वांना सोबत घेऊन जनआंदोलन उभे करणार आहे,’ असा इशारा प्रा. हाके यांनी दिला.
यावेळी अॅड. मंगेश ससाणे, सुरेश कोरडे, सरपंच स्वाती जमदाडे, उपसरपंच रेश्मा कानडे, गणेश नेवसे, निखिल झगडे, आदेश जमदाडे, अविनाश वाडकर, सिदूनाना नेवसे, तुषार देवडे, हनुमंत नेवसे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले, महाराष्ट्रात पुढील ओबीसी आरक्षण बचाव अंतर्गत वडीगोद्री आणि पुणे येथे उपोषणच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या, यासाठी शासनाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी 50 टक्केयशस्वी झालो आहे. आमचे आरक्षण टिकले यासाठी जन आंदोलन उभे राहत आहे.
यासाठी सिंदखेडराजा, गोपीनाथगड, पोहरादेवी, परळी, भगवानगड, चौंडी, भिवडी येथे अभिवादन केल्यानंतर नायगाव येथे आलो आहे. सध्या फोडा आणि झोडा ही पद्धत चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि येथील राजकारण्यांना आपले देणेघेणे नाही. आपल्याला मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे. फुले, शाहू, आंबडेकर यांचा विचार वारसा घेऊन आपल्या हक्क आणि आरक्षणासाठी पुढे यावे लागणार आहे, असेही प्रा. हाके यांनी म्हंटले.