सातारा प्रतिनिधी । ज्येष्ठ विचारवंत प्राच्य विद्या पंडित प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिवशी दि. २ ऑक्टोबर रोजी सत्यशोधक समाज रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंत नगर, गेंडामाळ, सातारा येथे होणार असून याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक उपराकार लक्ष्मण माने उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वागताध्यक्ष आनंदजी कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
साताऱ्यात पार पडणाऱ्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, कवी प्रमोद कोपर्डे , ज्येष्ठ पत्रकार व विद्रोही कार्यकर्ते विजय मांडके, ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. शरद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि महात्मा फुले यांची पगडी असे असणार आहे. डॉ. आ. ह साळुंखे यांचे साहित्यातील व प्रबोधन क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन तसेच त्यांचे संशोधनपर लेखनाची दखल घेण्यात आली आहे. तसेच महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म स्थापना दिवसाला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सत्यशोधक समाजरत्न जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.