कराड प्रतिनिधी । भावना ही व्यक्ती परत्वे भिन्न असते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्य रुजविणे काळाची गरज निर्माण झाली आहे. कारण बदलत्या काळामध्ये ही नैतिक मूल्ये हरवत चाललेली असून या मूल्यांचे जतन, संवर्धन आणि अंगिकार केला तरच सद्भावना निर्माण होऊन सामाजिक ऐक्य निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन कडेपूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख मा.प्रा.दिलीप पवार यांनी केले.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात राज्यशास्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘राज्यघटनेचे अमृतमहोत्सवी वर्षा’ निमित्त ‘राज्यघटनेची उद्देशपत्रिका व सद्भावना’ या विषयावरील कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे उपस्थित होते.
यावेळी प्रा.दिलीप पवार पुढे म्हणाले की, सद्भावना म्हणजे माणसाने माणसांशी सत्य, अहिंसा, प्रेम,आदर, सहानुभूती, निःपक्षपातीपणे वर्तन केले तर सद्भावना निर्माण होऊ शकते. तसेच राज्यघटनेमधील तत्व ही घटनेपुरती मर्यादित न राहता त्याला कृतीची जोड दिली पाहिजे. यावेळी डॉ.सतीश घाटगे म्हणाले की, समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी सद्भावनेची मूल्य आणि तत्वांचे आचरण होणे गरजेचे आहे. आपलं संविधान हे जगाच्या पाठीवरील सर्वात सुंदर आणि लोकहित जपणारे संविधान आहे.
याप्रसंगी ‘राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे, मुलभूत हक्क आणि कर्तव्य’ या विषयावर आयोजित केलेल्या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा.जी.बी.गायकवाड, परिचय राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष कांबळे यांनी सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा भाटले यांनी तर आभार प्रा.जयदिप चव्हाण मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रघुनाथ गवळी, सदस्य प्रा. विश्वनाथ सुतार तसेच राज्यशास्त्र विभागाचे प्रा.प्रविण देशमुख कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.