सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये BBA एव्हिएशन मॅनेजमेंट हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापरिषद व नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा अभ्यासक्रम सुरु होत आहे. विमानसेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे विमानचालन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा फायदा ग्रामीण भागातील युवक-युवतींना झाला पाहिजे. BBA हा अभ्यासक्रम कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये सुरू करण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली.
सातारा येथे नुकतीच विद्यापीठाच्या नियामक मंडळ व विद्यापरिषदेची बैठक पार पडली. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्याची विहित प्रक्रिया पूर्ण करून चालू शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. एव्हिएशन क्षेत्रात फ्लाईट अटेंडंट, केबिन क्र्यू, एअर होस्टेस, एअरपोर्ट मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्यूटिव्ह, फूड अँड बेवरेज मॅनेमेंट, एअरपोर्ट फायनान्स, एअर इन्श्युरन्स, एअर कार्गो मॅनेजमेंट, एअरपोर्ट फॅसिलिटी मॅनेजमेंट, एअरपोर्ट स्क्रीनिंग ऑफिसर्स, मार्केटिंग सर्विसेस, रिझर्वेशन अँड पॅसेंजर सर्विसेस इत्यादी प्रकारच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचे शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नसल्याने परिसरातील युवक-युवतींना या क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध होऊ शकत नव्हत्या या बाबीचा विचार करून विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी एव्हिएशन मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली जाणार असून एव्हिएशन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध प्रकारच्या संस्था व कंपन्यांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि ऑन दि जॉब ट्रेनिंगची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. शिर्के यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या नियामक मंडळ व विद्यापरीषदेच्या बैठकीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विठ्ठल सावंत, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. जयकुमार चव्हाण, प्रा. डॉ. शुभदा नायक, प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, प्रा. डॉ. डी. डी. नामदास, डॉ. धनजी जाधव, डॉ. हेमंत उमाप, डॉ. सुवर्णा कुरकुटे, डॉ. राजशेखर निल्लोलू, प्रा. डॉ. रोशनारा शेख, डॉ. महेंद्र जगताप आदि सदस्य उपस्थित होते.