कराड प्रतिनिधी । माणसाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक कोणता असेल तर तो हास्य आहे. हास्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढते. जशी मैला मैलावर भाषा बदलते, तसेच हास्याचे प्रकारे बदलतात. त्याचबरोबर प्रत्येक भाषा आणि त्यातील उच्चारातूनही अनेक गमती-जमती घडत राहतात, असे सांगून प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व हे त्याच्या आवाजावर अवलंबून असते, असे मत झी मराठी वृत्तवाहिनीचे पहिले हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी व्यक्त केले.
कराड येथील नगरपरिषद आणि नगरवाचनालयातर्फे आयोजित 92 व्या शारदीय व्याख्यानमालेत शेवटचे नववे पुष्प गुंफताना ‘हास्यकल्लोळ’ या विषयावर त्यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रा. बी. एस. खोत, प्रशांत लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या एकपात्री प्रयोगात सुरुवातीला प्रा. दीपक देशपांडे यांनी डॉक्टर आणि रुग्णांतील संवाद, तसेच पोलिसांमधील आवाजातील गमतीजमती सादर केल्या. तसेच बस स्थानकावरील अनाउन्सरच्या सादर केलेल्या विशिष्ट पट्टीतील हुबेहूब आवाजाला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्याचबरोबर विमानतळावर विविध देशांतील स्थानिक भाषेत होणारी अनाउन्समेंट सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. आकाशवाणीवरील निवेदन, विविध कार्यक्रम, फोनवरील गमतीशीर संभाषण आणि रॉंग नंबरचा मजेदार काल्पनिक किस्साही त्यांनी रसिकांसमोर सादर केला. त्यालाही चांगली दाद मिळाली.
राजकीय दिग्गज नेत्यांची मिमिक्री
अनेक राजकीय दिग्गज नेत्यांचा हुबेहूब आवाज त्यांनी सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांचे हुबेहूब आवाज सादर केले. याला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तसेच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सचिन तेंडुलकरचे शतक झाल्यावर प्रतिक्रिया कशी दिली असती, याचे गमतीशीर सादरीकरण केले. वृत्तवाहिन्यांवरील महाचर्चांमध्ये बोलत असताना किरीट सोमय्या, सभागृहातील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण, अण्णा हजारे यांच्या आवाजातील हिंदी आणि मराठी भाषेतील संवादाच्या गमती, तसेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा हुबेहूब आवाज सादर केला. त्यांच्या या कलाकारीला उपस्थित रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला