कराड प्रतिनिधी । कराड येथील प्रितीसंगम हास्य परिवाराच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील हास्यपरिवाराने “हसण्यासाठी जगायचं रं.. जगण्यासाठी हसायचं रं” हा एक अनोखा उपक्रम आयोजित केला होता. शहरातून हास्य दिंडी काढण्यात आली. दत्तचौक ते कृष्णा घाट निघलेल्या दिंडीत प्रितीसंगम हास्यपरिवाराने चौका-चौकात हास्ययोग साधना करून समाजात हास्ययोग साधनेचे महत्व सांगण्यात आले.
समाजात दिवसेंदिवस जीवनातील हास्य लोप पावत आहे. सर्वत्र अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे समाजात कृत्रिम हास्याला महत्व प्राप्त झाले. या प्रेरणेतूनच शहरा-शहरातून हास्य क्लबच्या स्थापना झाल्या. सर्वत्र हास्यक्लब एकत्र येऊन राज्य, देश व जागतिक हास्य क्लब निर्माण झाले. त्या अनुशंगाने कराड येथील स्वामींच्या बागेत २६ वर्षापूर्वी प्रितीसंगम हास्यक्लब स्थापन केला. त्याच्या विविध उपनगरात सहा शाखांमध्ये विस्तार होवून प्रितीसंगम हास्यपरिवारात रूपांतर झाले आहे. हा परिवार अनेक वर्षापासून हास्ययोग साधनेचा प्रसार करण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहे.
२०२१-२२ हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त परिवाराने महिन्यातील प्रत्येक २० तारखेला विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २० मार्च हा हास्य परिवाराचा स्थापना दिवस त्यानिमित्त प्रीतिसंगम हास्य परिवाराने शहरातून हास्यदिंडी काढली. या हास्यदिंडीची दत्तचौकातून सुरूवात करून यशवंत हायस्कूल मार्गे हेडपोस्ट चौक, महात्मा फुले चौक, अंबेडकर चौक, कन्याशाळा, सोमवारपेठ मार्गे कृष्णा घाटावर सांगता करण्यात आली. या शोभा यात्रेत वेगवेगळी वेशभूषा करुन सर्व शाखांच्या शेकडो सदस्यांनी चौकाचौकात हास्ययोग साधना करून हास्य शोभा यात्रेतून एक वेगळा संदेश दिला.