सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घराणेशाहीच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्याच व्यापसीठावर घराणेशाही असलेले किती लोक बसले आहेत ते त्यांनी पाहावं. अनुराग ठाकूर कोण आहेत? अमित शाहांची मुलं कशी अॅडजस्ट झाली. घराणेशाहीचं नाव घेऊन फक्त गांधी घराण्याला टार्गेट करण्याशिवाय मोदी काही करत नाहीत. परंतु, त्यांचे कर्तृत्व आणि बलिदान पाहा. इंदिरा गांधी, राजीव गांधींचे बलिदान विसरला का? असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्यात माध्यमांशी बोलताना केला आहे.
राष्ट्रपती, शंकराचार्यांना निमंत्रण का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या अधिकाराने राम मंदिर प्रतिष्ठापना करताहेत, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. राष्ट्रपतींना का बोलावलं नाही. त्या विशिष्ट समाजाच्या आहेत म्हणून का? असे अनेक प्रश्न आहेत. मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठापना करणं चुकीचं असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. आता काय करायचं ते मोदी ठरवतील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
निवडणुकीसाठीच राम मंदिराचा मुद्दा काढला
मोदी सरकार 2014 ला सत्तेवर आलं. त्यावेळी अच्छे दिन आणणार, काळा पैसा बाहेर काढणार, दोन कोटी रोजगार देणार, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशा घोषणा केल्या. मात्र, नोटबंदी, जीएसटीमुळे त्यांचा तो कार्यक्रम सपशेल फेल गेला. पुढच्या पाच वर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा काढला. मोदी है तो मुमकीन है, छप्पन इचं छाती वगैरे सगळं केलं. त्यानंतर पुलवामा हल्ला झाला. पुलवामा संदर्भात जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल बोलले. परंतु, त्याचे विश्लेषण करायला कोणी तयार नाही. चीनने आपल्या भूमीवर आक्रमण करून वीस सैनिक मारले. भारतीय हद्दीत छावण्या उभारल्या. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. संसदेत कोणीही घुसतंय. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही फेल गेल्यामुळे राम मंदिराचा मुद्दा काढला असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.