कराड प्रतिनिधी | लोकसभा सभापतिपदाचा चेहरा निश्चित करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली तर त्याला पाठिंबा दिला जाईल. आपल्याकडे लोकशाहीत ती परंपरा चालत आली आहे. मात्र, रेटून काही केलं तर आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आहे.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या ‘लोकनेते विलासराव पाटील प्रवेशद्वार’ कमानीच्या उद्घाटनानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेटीव्ह सेट करण्यासाठी एनजीओंचा वापर केल्याच्या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही एनजीओंचा वापर लोकशाही वाचवण्यासाठी केला. त्यांचे आम्ही आभार मानतो. सत्ताधाऱ्यांना त्यात अर्बन नक्षलवादी घुसल्याचे वाटत असेल तर सरकारने त्याची चौकशी करावी.
राहुल गांधींचा विजय झाला. त्यावर अविश्वास का दाखवत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ईव्हीएम खराब आहे, असा आम्ही आरोप केलेला नाही. पण, उत्तर पश्चिम मुंबईत काहीतरी घडल्याशिवाय गुन्हा दाखल केला आहे का? त्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी आम्हाला का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
कुणबी नोंदी रद्द करण्यासह कुणबींना ओबीसीत घेण्याचा जीआर काढू नये, यासाठी ओबसीसी नेत्यांनी उपोषण सुरू केलंय. तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचा ठराव त्यांनी केला आहे. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मनोज जरांगे यांचे उपोषण सोडताना नक्की काय आश्वासन दिले होते ते अगोदर मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. कारण मराठा समाजाची फसवणूक केल्याचा काय परिणाम झालाय, ते आपण पाहत आहोत.