कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता दि. 4 जून रोजी थेट निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. आज कराड येथे काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. 2014 मध्ये पुन्हा वाजपेयी सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्याच्या उलटे झाले. आताही निकालाबाबत सांगायचे झाले तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३२ जागा मिळतील, असे चव्हाण यांनी सांगितले.
कराड येथे आज माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीनंतर पृथ्वीराजबाबा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले की, देशात सध्या लोकसभा निवडणूक पार पडल्या असून काही लोकसभा मतदार संघाचे निकाल हाती येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात देखील ४८ जागांसाठी लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला साधारण ३२ जागा मिळतील असा विश्वास आहे. प्रत्यक्षात किती जागा मिळतील हे येणाऱ्या ४ तारखेला सर्वांना समजेल. जो काही माध्यमांकडून एक्झिट पोल जातो त्यातून केवळ त्यांचा टीआरपी वाढवण्यावर भर असतो. यातून फक्त लोकांची करमणूक होते. यामुळे एक्झिट पोलवर विश्वासार्हता राहत नाही.
https://www.facebook.com/100066721152780/videos/1062666928584595
यावेळी पृथ्वीराजबाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी शेतकऱ्यांवर सूड घेण्यासारखे काम केले आहे. देशातील तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केल्याचा राग मोदींनी त्यांच्यावर काढला आहे. निर्यात बंदी उठवून 40 टक्के निर्यात कर बसवल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे दाट धोके
निवडणूक आयोग हा निपक्षपाती असायला हवा. लोकांच्या मनात ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाची भूमिका यांवर शंका असेल तर लोकांनाच लढाई हातात घ्यावी लागेल. काँग्रेसने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आली. एकूणच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे दाट धोके असल्याचे आ. चव्हाण यांनी यावेळी म्हंटले.
काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिला ‘हा’ मोठा निर्णय घेणार
निवडणूक आयोगाची भूमिका समस्यास्पद आहे. निवडणूक आयोगामध्ये तीन सदस्य असतात. त्या निवडप्रक्रियेत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता अशी व्यवस्था होती. मात्र, याच वर्षाच्या सुरुवातीला ती व्यवस्था बदलून मोदींनी त्यातून सरन्यायाधीशांना काढून टाकत त्यामध्ये पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता एवढेच पद ठेवले. मग एकटा विरोधीपक्षनेता काय करणार? या व्यवस्थेतून त्यांची दोन निवडणूक आयुक्त नेमले. ते कोणला फॉर राहणार हे माहीत नाही. यामुळे आमचे सरकार आल्यावर सर्वप्रथम आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलून त्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करू, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही. आचारसंहिताच्या नावाखाली काही करायचे नाही, हा नवीन पायंडा पाडला जात आहे. लोकसभा गठीत होईपर्यंत आचारसंहिता हटवायची नाही, असे चुकीचे धोरण सरकारने घेतले आहे. तसेच राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच काम करत असल्याचा आरोप आ. चव्हाण यांनी यावेळी केला.