कराड प्रतिनिधी | साताऱ्याची निवडणूक आम्ही प्रचंड बहुमतांनी जिंकणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. आतापर्यंत झालेलं मतदान आणि ७, १३ आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानानंतर विरोधकांसाठी धक्कादायक निकाल असतील. अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकितही त्यांनी वर्तवल.
साताऱ्यातील निवडणूक आम्ही प्रचंड बहुमतांनी जिंकणार असून अंतिम निकालानंतर सहा पैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं आहे. राज्यात २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार बनलं. ते सत्तेवर राहिलं असतं तर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची एकही जागा निवडून आली नसती, असा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
फूट पाडून गेलेल्या गद्दारांना मतदार पाडणार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्याआधी दुपारी पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडून जे आमदार गेले. त्यांना मतदार आपल्या बरोबर आहेत, असे वाटत असेल तर त्यांचा तो भ्रम या निवडणुकीत दूर होईल. मतदार सर्व गद्दार आमदार, खासदारांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
मोदींनी प्रचाराची पातळी खाली नेली
प्रचाराची पातळी फारच खाली गेली. उमेदवार आणि प्रचारकांच्या पातळीवर ते समजून घेता आलं असतं. परंतु, पंतप्रधानांनी प्रचाराची पातळी खाली नेली, हे आश्चर्यकारक असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. लोकांच्या मुद्यावर चर्चा करण्याऐवजी वैयक्तिक टीकाच जास्त झाली. शरद पवारांबद्दल पंतप्रधान भटकती आत्मा म्हटल्यानंतर भाजपला मोदींचे फोटो असलेले पोस्टर्स काढावे लागले. इतका लोकांच्यात राग असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
उदयनराजेंना निवडून यायची खात्री नाही
सातारा लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी बऱ्याच सभा झाल्या. राज्यसभा देतो. मंत्रिपद देतो. कारखान्याला कर्ज देतो, अशी बरीच आश्वासन दिली गेली. पण, त्याचा काही उपयोग होणार नाही. २०१९ मध्ये उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देवून पोटनिवडणूक लढवली होती. पण, आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही. जर निवडून यायची खात्री असती तर राजीनामा देवून निवडणूक लढली असती, असं सांगून ते पुढे म्हणाले, या निवडणुकीचा जो निकाल निक लागेल तो बराच अनपेक्षित असेल.
निकालानंतर सहापैकी दोन पक्ष संपुष्टात येतील
महाविकास आघाडीच्या बाजूने आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात एक सुप्त लाट असून निवडणुकीचे टप्पे वाढत जाताहेत तसतसे ती सुप्त लाट उघड व्हायला लागली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल, अशा प्रकारचा निकाल लागेल. शरद पवारांशी झालेल्या चर्चेत अपेक्षित नसणाऱ्या जागा देखील निवडून येतील, अशी माहिती समोर आली. अंतिम निकालानंतर सहापैकी दोन पक्ष संपुष्टात येतील, असं भाकितही पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलं.