लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पृथ्वीराजबाबांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीसाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने ही निवड करण्यात आली. कॅम्पेन कमिटीमध्ये चेअरमन आणि ५७ सदस्य आणि १ समन्वयक असणार आहे. या कमिटीतील सदस्यपदी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या पाचपैकी ४ मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमधून आमदार विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमधून डॉ. नामदेव किरसान या चार उमेदवारांची नावे आज रात्री काँग्रेसने जाहीर केली. चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव काँग्रेसने गुलदस्त्यात ठेवले आहे. दरम्यान, आज काँग्रेसकडून कॅम्पेन कमिटीतील ६० जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.