कराड प्रतिनिधी । दोन दिवसापूर्वी कराड शहरातील प्रीतिसंगम बागेच्या भागातील खाद्य पदार्थांच्या हातगाडे धारकांना धमकावीत हफ्ता वसुलीसाठी दमदाटी करत असल्याची घटना घडली. याप्रकरणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच घटनास्थळी भेट देऊन घाटावरील हातगाडा धारकांशी संवाद साधला. यावेळी कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड दम आ. चव्हाण यांनी गुन्हेगारांना दिला. तसेच जे कोणी खंडणीखोर आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व शहरातील कायदा सुव्यवस्था अजिबात बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ काळजी घ्यावी अशा सूचना देखील यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचे DYSP अमोल ठाकूर तसेच जिल्ह्याचे SP समीर शेख यांना केल्या.
कराड येथील प्रीतिसंगम घाटावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा हातगाडेधारकांची भेट घेतली तेव्हा कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात, प्रशांत देशमुख, विनायक मोहिते, जयवर्धन देशमुख, विश्वजित दसवंत, अबरार मुजावर आदीसह घाटावरील बाधित हातगाडेवाले यावेळी उपस्थित होते.
यावेळी ज्या हातगाडेधारकांना हफ्ता मागणाऱ्या गुंडाचा त्रास होतो अशा सर्वांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर हात जोडून विनंती केली. पृथ्वीराजबाबा आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला न्याय द्यावा, ह्या गुंडगिरीतून आम्हाला आधार द्यावा,अशी गाऱ्हाणी हातगाडेधारकांनी मंडळी. त्यानंतर आ. चव्हाण यांनी बाधितांना विश्वास देत कोणीही गुंडगिरी करत असेल व कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे, घाटावर विशेष पथक नेमले जावे व तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशा सूचना आ. चव्हाण यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच इथून पुढे अशा घटना घडल्या तर पोलिसांना तात्काळ संपर्क करा आणि तरीसुद्धा मार्ग निघत नसेल तर मला डायरेक्ट फोन करण्याचे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी करत घाटावरील हातगाडेधारकांना आधार दिला यामुळे हातगाडे धारकांनी समाधान व्यक्त करीत पृथ्वीराज बाबांनी गुन्हेगारांच्या बाबतीत घेतलेल्या कडक भूमिकेचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले.