कोयना पुलावरील पाईप लाईनच्या कामाचा पृथ्वीराज बाबांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील कोयना नदीवरील नवीन कोयना पुलावर भेट देऊन पुलावरून येणाऱ्या पर्यायी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली. “कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य ठेवा,” अशा सक्त सूचना यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील कोयना नदीवरील नवीन कोयना पुलावर भेट देऊन पुलावरून येणाऱ्या पर्यायी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात पाणीपुरवठा प्रश्नाचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर आ. चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कराड शहराला वारूंजी जॅकवेल मधून पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून गुरुवारी १ ऑगस्टला या पाईपलाईनची चाचणी होऊन कराड शहराला २ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास दोन दिवसात पर्यायी पाईपलाईन मधून शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल.

कराड शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागल्यानंतर पालिकेने तातडीने जुना जॅकवेल कार्यान्वित केला होता. मात्र, त्याची विद्युत वाहिनी तुटली होती ती विद्युत वाहिनी आता नवीन टाकण्याचे काम तातडीने सुरू आहे. ही विद्युत वाहिनी कार्यान्वित केल्यानंतर शहराचा डिझेल जनरेटरवर असणारा पाणीपुरवठा बंद होऊन जुन्या जॅकवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणार आहे. त्याचबरोबर नवीन कोयना पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्यात सुरू आहे. हे काम दोन दिवसात पूर्ण होईल.

पाईपलाईनला काही ठिकाणी वळणे आहेत त्यामुळे पाणी क्षमता किती राहणार याबाबत शंका आहे. तरीसुद्धा या गोष्टीला सद्यस्थितीत पर्याय नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर या पाईपलाईनची चाचणी घेण्यात येईल. ती यशस्वी झाल्यानंतर शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.

कराड शहराला रोज ३० एम एल डी पाण्याची गरज असून जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रोज २२ ते २३ एम एल डी पर्यंत पाणी पुरवठा होईल. मात्र, प्रत्यक्षात पाहणी केली असता हे शक्य होईल का? याची मला शंका वाटत आहे. कारण जल वाहिनीला वळण असत नाही. या पाईपला १२० अंशाचे वळण टाकावे लागले आहे. तरीपण १८ ते २० एम एल डी पर्यंतचा पाणी पुरवठा होईल. ही पर्यायी व्यवस्था काही दिवसांसाठी असेल. मात्र कायमस्वरूपी पर्याय म्हणून नवीन कोयना पुलावरून ६०० मिलिमीटर व्यासाच्या दोन पाईप लाईन टाकाव्या लागणार आहेत. या पुलाची हा दाब सहन करण्याची क्षमता आहे का, याची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा बोलणे झाले आहे. काम समाधानकारक सुरू आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पाणी पुरवठा किती क्षमतेने होईल अशी माहिती आ. चव्हाण यांनी यावेळी दिली.