कराडच्या विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; पृथ्वीराजबाबांनी भर सभागृहात मानले धन्यवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवशी राज्यातील 28 विमानतळांच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित झालेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असून राज्यातील 28 विमानतळांसह कराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे विमानतळांच्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या अडचणी पाहून त्या सोडवल्या जातील तसेच हेलिपॅड देखील बनवण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे भर सभागृहात धन्यवाद मानले.

अधिवेशनात विमानतळांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात एअरपोर्टची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल.

मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवी मुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी म्हंटले.

यावेळी कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर येत्या तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कराडच्या विमानतळाचा विषय खूपच महत्वाचा : पृथ्वीराज चव्हाण

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे धन्यवाद व्यक्त करतो कि, त्यांनी कराडच्या विमानतळाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणचे पहिले विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कराड येथे याच करिता केले होते कि ते अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. कराडच्या विमानतळाला गावकऱ्यांचा विरोध नाही तर त्याला काही निधी पाहिजे त्याबद्दल शासनाने बैठक लावली तर तो प्रश्न मार्गी लागेल. 28 नोव्हेंबर 2022 ला MADC च्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात एक हेलिपॅड तयार करायचे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक तरी हेलिपॅड असावे, आणि त्याकरिता अनेक जागाही निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. हा एक चांगला निर्णय घेतला असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले.

लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन अंमलबजावणी करू : फडणवीस

काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी जेव्हा नांदेड येथील विमानतळाचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नांदेड विमानतळासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे. रिलायन्सकडून ते नंतर वसुल करण्यात येतील. परंतू नांदेडला नाईट लॅण्डींगची सुविधेसह काम व्हावे अशी योजना आहे. परंतू मुंबई विमानतळाकडे दिवसाचा स्लॉट नसल्याने अडचणी आहेत. एका नांदेडला नाईट लॅण्डींग सुविधा झाली की रिजनल कनेक्टीविटी होऊन विमानतळ फायद्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही विमानतळ एमआयडीसी तर काही अन्य एजन्सीकडे असल्याने सर्वांसाठी एकच नोडल एजन्सी तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी बैठक केली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले.