कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि ‘आरएसएस’वर निशाणा साधला. फडणवीस यांनी भाजपच्या पुण्यातील अधिवेशनात केल्या टिकेवरून फडणवीसांवर निशाणा साधला. “गृहमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या तोंडी ठोकाठोकीची भाषा शोभत नाही. त्यांना थोडीजरी लाजलज्जा असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.’पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग आणि निवडणूक आयोगाचा दुरुपयोग ज्यांनी सत्तेसाठी केला. ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे. फडणवीस सारख्या गृहमंत्र्याच्या तोंडून ठोकाठोकीची भाषा शोभत नाही, अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, अन्वर पाशाखान आदी उपस्थित होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना ठोकून काढा, असे नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यांच्या सारख्या गृहमंत्र्याच्या तोंडून ठोकाठोकीची भाषा शोभत नाही. भ्रष्टाचारातून त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले आहे. तुरुंगात माणसं टाकून दहशत निर्माण केली जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. कारण, देशभरात वर्षात जेवढ्या शेतकरी आणि मजुरांच्या आत्महत्या होतात. त्यातील ३७ ते ३८ टक्के आत्महत्या या महाराष्ट्रातील असून मागील तीन वर्षात ते दिसूनही आले आहे. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात १२६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यामध्ये अमरावती विभाग पुढे आहे. हे राज्यासाठी भूषणावह नाही. केंद्र शासनानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. दरडोई उत्पन्नातही महाराष्ट्र देशात १४-१५ व्या क्रमांकावर घसरला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
खेडकर प्रकरणात मोदींची जबाबदारी काहीच नाही का?
आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली. याबाबत दिल्लीतही गुन्हा नोंद झाला आहे. खरेतर केंद्र शासनाच्या डीओपीटी मंत्रालया अंतर्गत युपीएसी काम करते. या मंत्रालयाचे मंत्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. खेडकर प्रकरणात त्यांची जबाबदारी काहीच नाही क? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.
पाटणला आघाडीचा विजय होणार
यावेळी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबतही चव्हाण म्हणाले की, आघाडीत विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत थोडी चर्चा झाली आहे. पण, महायुतीचा पराभव होईल या निकषावर आघाडी उमेदवार देईल. या निवडणुकीत महायुतीचा पराभव ठरलेला आहे. तसेच त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातही आघाडीचा विजय होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
नेमके काय म्हणाले होते फडणवीस?
‘विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा.ज्याल बॅटींग करायची त्याने करावी पण अट एकच हिट विकेट होऊ नका. कारण समोरच्यावर बोलण्यापेक्षा आपल्यावर बोलला तर पुढीच चार दिवस त्याचे उत्तर देत बसावे लागेल.’असे फडणवीस यांनी काल रविवारी पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात म्हटले होते.