कराड प्रतिनिधी । कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने आज माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड व मलकापूरचे मुख्याधिकारी, NHAI चे अधिकारी, डीपी जैन कंपनीचे अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये कराडकरांना टॅंकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार असून पर्यायी व्यवस्था म्हणून पुलावरून 500 एमएमची नविन पाईपलाईन तात्काळ टाकण्याची सूचना आ. चव्हाण यांनी केली आहे. यासाठी थेट NHAI चे प्रोजेक्ट हेड पंधरकर यांच्यासोबत फोनवरून बोलून इमर्जन्सी परिस्थिती म्हणून पुलावर पाईप टाकण्यासाठी परवानगी देण्यास सांगितले. यासह अन्य पर्यायी मार्गावर अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
कराडच्या पाणी प्रश्नाबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज तातडीने प्रांताधिकारी, कराड नगरपालिका मुख्याधिकारी, एमजीपीचे अधिकारी तसेच हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आदीसोबत मिटिंग घेऊन पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पाच प्रमुख पर्याय सुचविले. यावेळी अधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर आमदार चव्हाण यांनी संबंधाची जुन्या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील केली.
या बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, कराड नगरपालिका मुख्याधिकारी शंकर खंदारे, MGP चे अधिकारी, डी पी जैन कंपनीचे अधिकारी, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराडचे माजी उपगराध्यक्ष जयवंतराव पाटील, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, राजापूरे, संजय ओसवाल, साहेबराव शेवाळे, गणेश गायकवाड आदीसह कराड शहरातील काही नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड शहरात उद्भवलेल्या पाण्याच्या प्रश्नी आज सर्व अधिकाऱ्यांची बैठकी घेतली असून शहरात कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच महत्वाचे पाच पर्याय देखील सुचवले आहेत. कराड शहरातील नागरिकांनी निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनास केलेल्या आहेत. मात्र, पावसाळा असल्यामुळे मिळणारे गढूळ पाणी उकळून नागरिकांनी प्यावे. याचबरोबर नागरिकांनी महत्वाचे पर्याय वापरावेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून ते उद्या कराड येथे भेट देऊन निर्माण झालेल्या पाणी परिस्थितीची माहिती घेणार आहेत. सध्या रात्र-दिवसपाण्याच्या पाईपचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा सध्या तरी जपून वापर करणारे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पृथ्वीराज बाबांनी सुचवलेले प्रमुख पर्याय
- सद्य परिस्थितीत शहराला तात्काळ टँकरने पाण्याची व्यवस्था व ती संख्या वाढविणे व त्याचे वॉर्ड निहाय नियोजन करणे.
- जुनी पाणीपुरवठा योजना चालू करणे.
- जी पाईप तुटली आहे तिथे नवीन पुलावरून पाण्याची पाईप काही महिन्यासाठी सुरु करणे.
- कराड शहरात शुक्रवार पेठेतील जुने वाॅटर हाउस पुन्हा चालू करणे
- कराड शहराला पाण्यातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सध्या विस्कळीत झाली असून सुरळीत होण्यासाठी कोयना पुलावरून 500 एमएमची पाईप टाकून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल.
जुन्या योजनेतून निम्म्या कराडकरांना लवकरच पाणीपुरवठा
पंकज हाॅटेलच्या पाठीमागे असलेली जुनी स्कीम सुरू करण्यासाठी पालिककेडून युध्दपातळीवर काम सुरू असून त्याचाही आढावा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला. या पाणीयोजनेतील गाळ काढून टेस्टींगचे काम सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या टीम काम करत आहेत. आज मंगळवार (16 जुलै) रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत टेस्टींग पूर्ण होवून 8 वाजेपर्यंत पाणी योजनेतील टाकीत साठवले जाईल. त्यानंतर मध्यरात्री किंवा उद्या सकाळपर्यंत कराडमधील 50 ते 70 टक्के भागापर्यंत पाणी पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी सांगितले.