विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, नुकताच छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

यावेळी महाविद्यालयचे प्राचार्य देशमाने, इंद्रजित चव्हाण, नानासो जाधव, मानसिंग जाधव, तानाजी माळी, विवेक जाधव, प्रा.प्रमोद माने, प्रा.पवार, प्रा.गायकवाड, प्रा.पिसे आदिसह विद्यार्थी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

यावेळी आ. चव्हाण म्हणाले की, गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना तंत्रज्ञान चा अभ्यास कुतूहलाने केला पाहिजे. आज भारतातील उद्योग क्षेत्राचा वाटा अर्थव्यवस्थेच्या 27-28 टक्के आहे. तर सेवा क्षेत्राचा जवळपास 60% आहे. आपल्या देशात 17 टक्के निर्मिती क्षेत्र असून ते किमान 25 टक्केपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे तर आपल्याला चीन सारख्या देशावर अवलंबून रहावे लागणार नाही. चीन मध्ये निर्मिती क्षेत्र जवळपास 30 टक्के इतके आहे. कुशल मनुष्यबळ असेल तर निर्मिती क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते.

भारतात सेमिकंडक्टर चा उद्योग झाला पाहिजे. कारण बरेच तंत्रज्ञान विकसित झाले असून ते सेमिकंडक्टर मुळे प्रगत झाले आहे. ड्राइवर विरहित कार असतील किंवा इलेक्ट्रिक वाहने ही सर्व सेमिकंडक्टर ची किमया आहे. आपल्या देशात जवळपास दीड कोटी रोजगार निर्मिती दरवर्षी झाली पाहिजे तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. तसेच अर्थव्यवस्थेचा विकासदर हा किमान 8-9 टक्के इतका झाला पाहिजे तरच दरडोई उत्पन्न वाढेल. पण सद्या आपल्या देशाची तशी परिस्थिती नाही, अर्थव्यवस्था दर तितका नाही त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढले तरच देश विकसित होण्यास मदत होईल, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.