कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आज सकाळी 11.24 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा हा निर्णय दुर्दैवी आहे. अजूनही अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. कोणताही आमदार त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाही. भाजपाकडून वावड्या उठवल्या जात आहेत. पण त्यावर विश्वास ठेवू नये असे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. दोघांच्यात चर्चा पार पडल्यानंतर वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, रविवारी अशोक चव्हाण पक्षाच्या बैठकीत सक्रीयपणे उपस्थित होते. अजून तरी अशोक चव्हाण यांनी पुढची काही भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते जन्मापासून काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेससाठी खूप काही केलं हे ते सांगत होते. काँग्रेस आत्ताही त्यांना मोठी संधी देत होती. कालच आमच्या महाराष्ट्र प्रभारींसमवेत ज्येष्ठ नेते, अशोक चव्हाण यांची रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. संध्याकाळी ४-५ वाजेपर्यंत ते आमच्यासोबत होते.
काल बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण बाळासाहेब थोरातांना सांगून गेले की उद्या सकाळी ११ वाजता, म्हणजे आज भेटून पुढची चर्चा चालू ठेवू. काँग्रेस पक्षाकडून जागावाटपाबाबत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेसनं त्यांना मोठी संधी दिली होती. मोठा विश्वास टाकला होता. महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळातही ते ज्येष्ठ मंत्री म्हणून काम करत होते.
या सगळ्या प्रकाराबाबत भाजपाच्या नेतृत्वाकडून असं काही घडेल असे सूतोवाच होत होते. आज आम्ही काही पदाधिकारी, नेते बसून काँग्रेस विधिमंडळ सदस्यांना संपर्क केला आहे. उद्या आणि परवा राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी विधिमंडळ सदस्यांची बैठक घेतली जाईल. कोणताही आमदार त्यांच्यासोबत कुठेही जाणार नाहीये. भाजपाकडून वावड्या उठवल्या जात आहेत. पण त्यावर विश्वास ठेवू नये”, असे आमदार पृथ्वीराज बाबांनी सांगितले.