कराड प्रतिनिधी । उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल 4 जून रोजी लागला आणि या मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र, त्या दिवशी वायकर यांच्याशी संबंधित व्यक्ती मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने देशातील सर्व विरोधी पक्षांतील नेत्यांना एकत्रित करून बैठक घ्यावे आणि त्यांच्यासमोर सर्व काही सांगून टाकावे. उत्तर-पश्चिम मुंबई मतमोजणी केंद्रात मोबाईल वापर हि अत्यंत गंभीर घटना असल्याचे आ. चव्हाण यांनी म्हटले आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजनीच्या दिवशी जो प्रकार घडला. यावेळी घडलेल्या मोबाईल फोनच्या गैरवापरावर सर्वत्र चर्चा केली जात आहे. घटना हि ४ जूनला घडली आणि दहा दिवसानंतर १४ जूनला पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. पण तो गुप्त ठेवण्यात आलेला आहे.
या निवडणुकीत घडलेल्या या प्रकाराबद्दल एक नवीनच गोष्ट ऐकायला मिळत आहे की, कोणत्याही मोबाईल फोनवर इलेक्ट्रॉनिक मशीन उघडण्याचा ओटीपी जनरेट होतो. आणि त्याचबरोबर ‘इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हिस वोटर्स’ हि एक प्रणाली आहे. या प्रणाली बद्दल देखील आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत. या प्रणालीला हॅक केले गेले का? या प्रणालीमध्ये मतांची अदलाबदली करण्यात आली का? त्याठिकाणी कीर्तिकरांचा प्रभाव फक्त ४८ मतांनी झालेला दाखवलेला आहे. पण त्याच्या अगोदरच्या राउंडमध्ये तेआघाडीवर होते. म्हणजे अनेक गंभीर प्रश्न या घटनेतून निर्माण होत आहेत. मी निवडणूक आयोगाकडे एक मागणी करत आहे कि आयोगाने यावर ताबडतोब पत्रकार परिषद घ्यावी तसेच व्यापक याबद्दल एक स्टेटमेंट जरी करावे.
आज हा प्रश्न फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही. याची जगभर चर्चा सुरु झालेली आहे. एलॉन मस्क याने देखील त्वचा करून सांगितले आहे की, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. कोणतेही मशीन हॅक होऊ शकते. हि एक गंभीर घटना म्हणावी लगे, असे आ. चव्हाण यांनी सांगितले.
केवळ 48 मतांनी रवींद्र वायकरांचा विजय
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील अतिशय चुरशीची लढत मुंबई पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. पश्चिम उत्तर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दिवशी शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेस पाहायला मिळाली. त्यावेळी 48 मतांनी रवींद्र वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे मतमोजणीत हेराफेरी करण्यात आल्याची शंका अमोल कीर्तिकरांनी उपस्थित केली होती. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये पार पडली होती.
नेमकं काय घडलं होतं, आरोप काय?
गोरेगाव नेस्को मतमोजणी केंद्रावर 4 जूनला रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही उपस्थित होते. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेल्या पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात आली. ही पोस्टल बॅलेट सिस्टीम अनलॉक करण्यासाठी दिनेश गुरव याने ज्या मोबाईलवर ओटीपी पाठवला होता, तोच फोन मंगेश पंडीलकरच्या हातात होता. ईव्हीएम यंत्रांतील मतांची मोजणी सुरु असताना अमोल कीर्तिकर आघाडीवर होते, त्यांच्याकडे जवळपास 2000 इतके मताधिक्य होते. मात्र, इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टीममधील मतांची मोजणी सुरु झाल्यावर रवींद्र वायकर आघाडीवर गेले आणि कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला.