कराड प्रतिनिधी | अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या राज्यांतील निकालाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यनिहाय समिती स्थापन केल्या आहेत. मध्यप्रदेश राज्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आ. चव्हाण यांच्यासह समितीमध्ये सप्तगिरी उल्का, आ. जिग्नेश मेवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह छत्तीसगड, ओडिसा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा आदी राज्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी समाधानकारक तथा खराब झाली आहे अशा राज्यात समिती स्थापन केली असून पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले असून काँग्रेस पक्षाकडून सहा राज्यात प्रभारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. यासह केंद्रात काँग्रेसचे आघाडी सरकार असताना मित्र पक्षांसोबत समन्व्यक म्हणून सुद्धा अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. याचमुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मध्य प्रदेश राज्याची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.