रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत आ. पृथ्वीराजबाबा गटाला जोरदार धक्का; डॉ. अतुल भोसले गटाच्या 7 जागा बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी डॉ. अतुल भोसले गटाच्या समर्थकांनी विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली आहे. सत्ताधारी भोसले समर्थक गटाच्या कृष्णा विकास आघाडीच्या ७ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, गेल्या ३५ वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या जागरुक व संवेदनशील समजले जाते. या गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरु झाली आहे. सरपंचपदासह १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण ९२ जणांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सत्ताधारी भोसले गटाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न विरोधी गटाने सुरु केले होते. मात्र आज अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी भोसले गटाने ७ जागा बिनविरोध निवडून आणत, विरोधकांच्या प्रयत्नांना जबर खीळ घातली आहे आणि या निवडणुकीत यशस्वी आघाडी घेतली आहे.

सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीचे विठ्ठल वॉर्डमधून शरद नामदेव धर्मे, मारुती वॉर्डमधून रुक्साना गुलाब मुल्ला, शिवनगर वॉर्डमधून संग्राम दिलीप पवार, संगीता शिवाजी सावंत, सचिन अरुण जाधव, लक्ष्मी वॉर्डमधून शर्मिला संतोष मोहिते, भाग्यश्री रोहित पवार अशा एकूण ७ जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवनगर वॉर्डमधील सर्वच जागांवर सत्ताधारी भोसले गटाचे समर्थक निवडून आले आहेत. अर्ज माघारीच्या दिवशीच ७ जागांवर यश लाभल्याने भोसले गटाचा उत्साह दुणावला आहे. तर विरोधी गटाला मात्र मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण गटात निराशेचे चित्र दिसून येत आहे.