कराड प्रतिनिधी । आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या कॉलेजमध्ये सदिच्छा भेट दिली. तसेच इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत कमराबंद चर्चा केल्यानंतर गुजर ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. गुजर यांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशाच्या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा गटाला धक्का बसला आहे. गुजर यांच्या प्रवेशानंतर आता कराड पालिकेतही ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवताना बघायला मिळणार हे नक्की.
खासदार संजय राऊत यांनी मल्हारपेठ दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम सकाळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रीतिसंगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी बनवडी येथील काँग्रेस समर्थक इंद्रजित गुजर यांच्या कॉलेज येथे जाऊन त्यांच्यासोबत कमराबंद चर्चा केली. या चर्चेवेळी माई मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाचे माजी नगरसेवक राजेंद्र माने, नितीन बानुगडे पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम उपस्थित होते.
https://fb.watch/lnTcBFuM_S/?mibextid=Nif5oz
कमराबंद चर्चेनंतर थेट ठाकरे गटात प्रवेशाची घोषणा
माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासोबत कमराबंद चर्चा केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट गुजर यांच्या ठाकरे गटात प्रवेशाची घोषणा केली. यावेळी राऊत म्हणाले की, इंद्रजित गुजर हे राजकारण कमी आणि समाजकारण अधिक करतात त्यांचा संपर्क दांडगा आहे. ते उत्तम संघटक आहेत माझा त्यांच्याशी जुना संबंध आहे. त्यांनी शिवसेनेत यावे यासाठी आम्ही सगळे तसेच स्वतः उद्धव ठाकरेही इच्छुक आहेत. लवकरच त्यांचा मातोश्रीवरठाकरे गटात प्रवेश होईल.
100 टक्के उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश करणार : इंद्रजित गुजर
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे समर्थक माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी यावेळी आपण कार्यकर्त्यांसह 100 टक्के उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहे. मात्र माझ्या आजी-माजी सहकाऱ्यांशी चर्चा करून मी पुढच्या आठवड्यात या प्रवेशाचा मुहूर्त ठरवेन. माझा हा प्रवेश मातोश्रीवर झाला तरी कराडमध्ये त्यांनतर प्रचंड मोठा कार्यक्रम घेऊन शिवसेना वाढीसाठीच्या संघटनात्मक कामाला आपण लागणार असल्याचे यावेळी इंद्रजित गुजर यांनी म्हंटले.