कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी महायुतीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी तर महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयात असलेल्या निवडणूक विभागात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उदयसिंह पाटील उंडाळकर, इंद्रजित मोहिते, फारुक पटवेकर, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
यापूर्वी गुरुवार, २४ ऑक्टोबरला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी उमेदबारी अर्ज दाखल केला. तर या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे नेते इंद्रजित गुजर यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाह त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपा नेते मनोज घोरपडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयापासून पदयात्रा काढण्यात आली.
कडेकोट बंदोबस्त…
कराड शहरातील तहसील कार्यालयात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी तर यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी दिग्गज नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित आले होते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त सोमवारी तैनात करण्यात आली आहे.