सातारा प्रतिनिधी | काँग्रेसने डोनेट फॉर देश या मोहिमेंतर्गत १८ डिसेंबर २०२३ पासून क्राऊड फंडिंगची मोहिम सुरू केली होती. मात्र, काँग्रेसकडे फक्त ११ कोटी रुपयेच जमल्याची माहिती समोर आली होती. क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने देणगी जमा करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी प्रयत्न वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या मोहिमेत सहभागी होत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसला १ लाख ३८ हजार रूपयांची देणगी दिली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सोशल माध्यमावरून दिली आहे.
काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कॉंग्रेस हायकमांडचा हिरमोड झाला होता. तसेच कमी प्रमाणावर देणगी जमा झाल्याने हायकमांडने नाराजी व्यक्त केली. कार्यकर्ते आणि नेत्यांना फंडिंगसाठी प्रयत्न वाढविण्याचे आदेश देण्यात आले. दोन आठवड्यांत ११ कोटी रुपयांची देणगी पुरेशी नसल्याचे राहुल गांधी, खर्गे आणि प्रियंका गांधी यांचे मत आहे. आणखी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्याचे समजते. दरम्यान, हायकमांडच्या सूचना आणि आवाहनाला प्रतिसाद देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १ लाख ३८ हजार रूपयांची देणगी दिली आहे.
काँग्रेसला १ लाख ३८,००० रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्टद्वारे दिली आहे. तसेच ‘देशाच्या लोकशाहीचं रक्षण करुयात’, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराची साधनसामुग्री जमविण्यासाठी काँग्रेसने १८ डिसेंबर २०२३ ला ‘देशासाठी देणगी’ मोहिम सुरु केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १.३८ लाख रुपये देणगी देऊन पक्षाच्या ऑनलाइन क्राउडफंडिंग कार्यक्रमाची सुरुवात केली होती. त्यानंतर, देशभरातून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी देणगी स्वरुपात निधी दिला. मात्र, तो अपेक्षेपेक्षा कमीच जमा झाला. आता, पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेसच्या अध्यक्षांएवढीच १.३८ लाख रुपये देणगी म्हणून दिले आहेत.