सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महत्वाची मागणी करत मोठे विधान केले आहे. राज्य सरकारने मागीसवर्गीय आयोगाचा अहवाल आत्ताच्या आता एका तासात वेबसाईटवर टाकून सार्वजनिक करावा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढावा, असे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हंटले आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाणयांच्या उपस्थितीत आज लोणावळा येथे पक्षाचे राज्यस्तरीय शिबिर पार पडले. यानंतर आ. चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अध्यादेश काढण्यासाठी अधिवेशनाची गरज नाही तो पास करण्यास अधिवेशन लागते. आयोगाच्या अहवालात काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला व जरांगे पाटील यांनाही कळले पाहिजे, त्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज काय? असा सवाल देखील यावेळी आ. चव्हाण यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत महत्वाची आहे, त्यांच्या प्रकृत्तीला काय झाले तर जबाबदार कोण? मुख्यमंत्री शिंदे व मनोज जरांगे पाटील यांची बोलणी झाली. उपोषण सोडले, गुलाल उधळला व प्रश्न सुटला असे सांगितले मग पुन्हा उपोषण करण्याची गरज काय पडली याची उत्तरे दिली पाहिजेत, असेही आ. चव्हाण म्हणाले.