कराड प्रतिनिधी | जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या ‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ‘मंकीपॉक्स’ विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारील देशात पोहोचला आहे. त्यामुळे संसर्गीत देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करावेत, अशी मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, मंकीपॉक्स विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. संसर्गीत देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने सध्या काढता पाय घेतला आहे. मात्र, आता नव्या आजाराने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात ‘मंकीपॉक्स’ आजाराने थैमान घातले आहे. सत्तरहून अधिक देशांत ‘मंकीपॉक्स’ आजाराचा फैलाव झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आजाराच्या प्रकोपामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणीही जाहीर केली आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या ‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर राज्यात उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की,’मंकीपॉक्स’ व्हायरसमुळे ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केली आहे. आफ्रिकेत उगम झालेला हा व्हायरस आता वेगाने पसरत आहे. मंकीपॉक्स पाकिस्तानात पोहोचला आहे. आपल्या देशात त्याचा प्रवेश आणि प्रसार रोखण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलावीत, अशी आग्रही विनंती करीत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.