सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे त्यांना वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची नुकतीच दहिवडी येथे बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह देशमुख, सुरेश चव्हाण, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, अल्पना यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या देशभरासह राज्यात भाजप जातीजातीमध्ये द्वेष निर्माण करत आहे. कोणीतरी मनोहर भिडे येतो आणि वादग्रस्त वक्तव्य करून दंगली घडवितो. या देशात आता पुन्हा जर भाजपचे सरकार आले तर मोदी लोकशाही जिवंत ठेवणार नाहीत. ७० वर्षात जेवढे कर्ज नव्हते, तेवढे कर्ज मोदी सरकारने काढले आहे. त्यामुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. संविधान वाचेल की नाही सांगता येणार नाही.
माढ्याचा पुढील खासदार हा काँग्रेसचाच : पृथ्वीराज चव्हाण
देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदारसंघातील जनतेला माझे आवाहन आहे, तुम्ही ठाम राहा. पुढील खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल. भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे” असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दहिवडीत सभेवेळी व्यक्त केला.