सातारा प्रतिनिधी | ”देशाला आत्तापर्यंत काँग्रेसनेच तारले आहे. भविष्यातही काँग्रेसच तारेल. माणमध्ये नेतृत्व वाढविण्यात माझी चूक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस लढणार असून, रणजितसिंह देशमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पिंगळी येथे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलई व प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार रामहरी रूपनवर, राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख, एम. के. भोसले, नकुसाताई जाधव, बाबासाहेब माने, संतोष गोडसे, बाळासाहेब माने, डॉ. महेश गुरव, जयवंत खराडे, विजय शिंदे, विष्णुपंत अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, ”दुष्काळी माण-खटाव भागात पाणी आणणारे खरे जलनायक पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यामुळे सध्या या भागातून वाहणाऱ्या पाण्याचे श्रेय कुणीही लाटू नये.”
यावेळी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, राजेंद्र शेलार, अजित चिखलीकर यांचीही भाषणे झाली. डॉ. महेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले. एम. के. भोसले यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब माने यांनी आभार मानले.