सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा ततोतंत वापर करावा आणि लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे,त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा टक्का वाढवावा. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
विधानसभा निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व प्रांतअधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी एस. चोक्कलिंगम म्हणाले, सातारा जिल्ह्यात काही विधानसभा मतदार संघांमध्ये गत निवडणूकीतील मतदानाचा टक्का हा राज्याच्या निवडणूक मतदानाच्या टक्क्यापेक्षा कमी आहे.याची कारणे शोधून त्याठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी,यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांची मदत घेण्यात यावी.मतदान केंद्रांवर सर्व पायाभूत सुविधा सूव्यवस्थित राहतील याची खात्री करावी. प्रत्येक पात्र मतदाराला त्याचे मतदान ओळखपत्र मिळेल याबाबत दक्षता घ्यावी.
मतदार यादीतून नावांची वगळणी होत असताना भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. जास्त गर्दी होणा-या मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी बैठक व्यवस्था करावी, यासाठी टोकन पध्दती अंमलात आणावी. मतदान कक्षामध्ये एकावेळी चार व्यक्तींना प्रवेश द्यावा, व्हीव्हीपॅट व पॉवर पॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील हे कटाक्षाने पहावे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून निवडणूकीमध्ये तपासणी पथकांकडून जप्त करण्यात येणाऱ्या मुद्देमालांची संख्या अत्यंत कमी असते, असे एस चोक्कलिंगम यांनी म्हटले.
या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, बोगस मतदार नोंदणी संदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांचे विहीत मुदतीत निराकरण करण्यात येईल असे सांगून जिल्ह्यात करण्यात आलेल्या निवडणूक विषयक तयारीचा आढावा सादर केला. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनूषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.