कराड प्रतिनिधी । जगातील अनेक देशांच्या शासन-प्रशासन यंत्रणेत उलथापालथी होत आहेत. मात्र भारत देशातील लोकशाही आजही अधिक सक्षम असल्याचे दिसते. लोकशाहीच्या बळकटीकरणात भारतीय राज्यघटनेचे बहुमूल्य योगदान असल्याचे मत प्राचार्य प्रो. (डॉ.) सतीश घाटगे यांनी व्यक्त केले.
कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये आयोजित 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर येथील रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सलीम मुजावर, तर उपप्राचार्या डॉ. उज्ज्वला पाटील, पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. घाटगे म्हणाले, राज्यघटनेने समस्त भारतीयांना न्याय, स्वांतत्र्य, समानता व बंधुता ही मूल्ये प्रदान केली आहेत. संघशासनात राष्ट्रपती, न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, लोकसभा, राज्यसभा, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ या सर्व घटकांचे एकमेकांवर नियंत्रण असते. या संसदीय शासनपद्धतीमुळे भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून विश्वात परिचित आहे. यामागे राज्यघटनचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहका-यांचा सूक्ष्म अभ्यास, दूरदृष्टी व अतोनात परिश्रम आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राष्ट्राची एकात्मता व अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सलीम मुजावर यांनी शुभेच्छापर संदेश दिला. प्रा. गोरख गायकवाड यांनी संविधान प्रास्ताविका वाचन केले. या वेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. प्रा. देवदत्त महात्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रा. दीपक गुरव, प्रा. गौरव पाटील यांनी सहकार्य केले. या वेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
देशभक्तिपर गीतगायन कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय व कराड येथील प्रीतिसंगम हास्य क्लबच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तिपर गीतगायनाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात सुनील वाडकर, गोरख गायकवाड, रतनकुमार कवटे, बी. जी. जाधव, डॉ. मारुती सूर्यवंशी, रत्ना जोगी, प्रा. सुरेश यादव, अशोक जमदग्नी व प्रा. जोतीराम अंबावडे यांनी अपनी आझादी को, मेरा मुल्क मेरा देश, इन्साफ की डगर पे, ओठों पे सच्चाई रहती है, ऐ वतन तेरे लिए, शंकरा रे शंकरा इत्यादी देशभक्तिपर गीते सादर केलीत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश यादव यांनी केले.