पाटणला कुणबी नोंदीची शोधमोहीम झाली आता होणार वितरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरागे पाटील मोठ्या संख्येने मराठा बांधवासह मुंबईच्या दिशेने जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समजायचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण राज्यात 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू होत आहे. पाटण तालुक्यात देखील या सर्वेक्षणाची पूर्वतयारी करण्यात आलेली असून प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

पाटण तालुक्यात 453 प्रगणक व 32 पर्यवेक्षक यांची या कामाकरीता नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे. पाटण तालुक्यात मागील महिन्यात कुणबी नोंदीची शोधमोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात आली असून त्यानुसार पाटणमधील सुमारे 200 गावांमध्ये एकूण 38736 कुणबी संदर्भात नोंदी आढळून आल्या आहेत. या सर्व मराठी भाषेतील नोंदी असून मोडी भाषेतील नोंदी वाचनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. कुणबी नोंदी संदर्भातील आकडा आणखी वाढणार आहे.

या नोंदीच्या पार्श्वभूमीवर पाटण महसूल विभागाने यापूर्वीच कुणबी दाखल्याचे वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत सुमारे 800 कुणबी दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी ह्या पाटण तालुक्यात असून दाखले वितरणाचे प्रमाण देखील पाटण तालुक्यात सर्वाधिक असल्याने पाटण मधील सकल मराठा समाजाने समाधान व्यक्त केले आहे.

मनुष्य बळाची कमतरता असली तरी सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरा पर्यंत कार्यालयात थांबून ही मोहीम अधिक वेगवान करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.

कुणबी नोंदीच्या दाखल्याची वितरणाची मोहीम अधिक सुटसुटीत व वेगवान करण्यासाठी प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील सेतू कार्यालयात व तहसील कार्यालयात भेट देऊन प्रलंबित दाखल्याचे वितरण तत्परतेने होण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. जागेवरच सुमारे 23 कुणबी दाखले ऑनलाईन पद्धतीने निर्गमित केले आहेत.

इतकेच नाही तर प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी डिगेवाडी (अडुळ) व लुगडेवाडी येथील 5 कुणबी दाखल्याचे थेट घरपोहच वितरण करून संबंधित अर्जदार याना सुखद धक्का दिला आहे. यापुढे कुणबी दाखले वितरणाची मोहीम अधिक वेगवान करणार असून जास्तीत जास्त मराठा बांधवांना पुराव्याचे कागदपत्र सादर केलेनंतर तत्काळ दाखले वितरण करण्यात येईल, असे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.

तसेच शासनाच्या निर्देशानुसार 23 जानेवारी पासून पाटण तालुक्यात जे प्रगणक मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी येणार आहेत त्यांना सर्व मराठा बांधवांनी माहिती देऊन सहकार्य करावे असेही आवाहन सुनील गाढे यांनी केले आहे.