सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा शेजारीच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आलेले आहे.या महिनाभरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पातील 265 गावांचा बेस मॅप तयार केला आहे. या भागाची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू झाले असून येत्या काही महिन्यांत ही विकास योजना तयार केली जाणार आहे.
राज्यातील प्रमुख गिरिस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. त्यातून येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने महाबळेश्वरवर येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरिस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर वसविले जाणार आहे.
राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यातील सुमारे ७४८ चौरस किमी क्षेत्रासाठी ही योजना तयार केली जात असून, सांगली जिल्ह्याच्या हद्दीपासून ते महाबळेश्वरपर्यंत हा परिसर विस्तारला आहे. ‘एमएसआरडीसी’ने या भागाचा बेस मॅप तयार केला असून आता या भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत.
या सूचनांच्या विचारात घेऊन विकास योजना तयार केली जाणार आहे. त्यातून ती सर्वसामावेशक बनण्यास मदत मिळेल, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, स्थानिकांना त्यांच्या सूचना मांडता याव्यात, यासाठी महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात दि. २२ जुलैला, तर सातारा आणि पाटण तालुक्यात दि. ३ जुलैला तालुकानिहाय गावांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. .
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा पठारांनी वेढलेला जिल्हा
सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे. या पर्वत रांगांची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फुट आहे. तसेच फलटण तालुक्यातील नीरा नदीच्या खोऱ्या पासूनची उंची हि समुद्रसपाटीपासून १७०० फुटांपेक्षा जास्त आहे. हवामानाच्या बाबतीत महाबळेश्वर तालुक्याचा प्रभाग अधिक पाऊस पडणाऱ्या विभागात येतो.तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६००० मिमी असून माण व खटाव चा विभाग हा कोरड्या क्षेत्रात येतो.व तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ५०० मिमी आहे.जिल्ह्यातील पश्चिमेकडील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी जंगले आहेत तर पूर्वेकडील इतर भूभाग हा खुरट्या झुडपांनी व्यापलेला आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पात ‘या’ गावांचा समावेश
नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा जिल्ह्यातील चार तालुक्यातील गावाचा समावेश केला जाणार आहे. कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर बसविले जाणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात करण्यात आला आहे.