सातारा प्रतिनिधी । युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी राज्यातील महत्वाच्या प्रतापगड, पन्हाळगड, रायगड, शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांचे २०२४-२५ साठी भारताने ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’च्या माध्यमातून नामांकन केले आहे. या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडसह प्रतापगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा या नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहेत.
हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नावारूपाला आलेले आहेत. यातील अनेक किल्ल्यांची बांधणी शिवकालात, तसेच त्यानंतर झाल्याचे दिसून येते. प्रतापगड हा किल्ला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध करण्यात आला होता.