कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील येणके गावातील ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर कराड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. गावातील कुंभार वस्तीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत वितरण व्यवस्था व नळ जोडणी करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थानी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केले आहे.
गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी म्हटले आहे की, येणके गावातील कामातील दाबनलिकेचे काम पूर्ण झाले आहे. वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीत आहे. कुंभार वस्ती येथील नागरिकांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावे.
कराड तालुक्यातील येणके येथील कुंभार वस्ती येथील योजनेची सद्यस्थितीची प्रगती 40 टक्के इतकी आहे. उर्वरित काम येत्या 4 ते 5 महिन्यात पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येणार आहे. या योजनेद्वारे गावच्या पाणीपुरवठा विषयक समस्या कायम स्वरुपी मिटणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.