कराड प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची पदोन्नतीने कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी निवड करण्यात आली असून कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना गुरुवारी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश राज्यपालांच्या आदेशाने काढण्यात आले. दरम्यान, आज शनिवार दि. 22 मार्च रोजी प्रशांत व्हटकर हे कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
दिनांक 10 जून 2023 रोजी कराड नगरपालिका नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे यांची निवड झाली होती. त्यानंतर 13 जुलै रोजी 2023 रोजी खंदारे यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली होती. पदोन्नती नंतर खंदारे यांना अमरावती विभागातील अकोला महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले होते. मात्र खंदारे यांनी या ठिकाणचा पदभार स्वीकारला नव्हता ते कराडला मुख्याधिकारी म्हणून कायम राहिले होते.
दरम्यान कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना आज पासून कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील असेही या राज्यपालांच्या आदेशात म्हटले आहे.