कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची (Satara Lok Sabha Election 2024) कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणत्याच वरिष्ठ नेत्यांकडून घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून जेष्ठ नेते श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांचे सुपुत्र सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर हे इच्छुक आहेत.त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार? याची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गटातील पुरुषोत्तम जाधव व भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, आता सातारचा खासदारकीचे उमेदवार कोणीही असो पण खासदार कोण होणार हे सैनिकच ठरवणार असल्याचे महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी आज जाहीर केली आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज महाराष्ट्र सैनिक फेडरेशनच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी फेडरेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी माहिती दिली. यावेळी प्रिया सोनटक्के, सर्जेराव देसाई, विनोद वाघमारे, सचिन थोरवे, गोरख साळुंखे, महादेव देशमाने, विजय पवार, शिवाजी पाटील, सुरज जगताप, सुषमा सुतार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत कदम म्हणाले की, सातारा जिल्ह्यात जवळपास 50 हजारांच्या आसपास आजी-माजी सैनिकांची संख्या आहे. परंतु, त्यांच्या समस्या, अडचणींकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही. त्यामुळे या सैनिक निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सैनिक निर्णायक भूमिका घेणार असून जिल्ह्याचा खासदार सैनिक ठरवतील.
शहीद जवानांच्या कुटुंबियांना शेत जमिनीचा ताबा द्यावा, त्यांच्या पत्नी किंवा मुलांना शैक्षणिक अहर्तेनुसार सरकारी नोकरीत समाविष्ट करावे, समान पेन्शन प्रणाली लागू करावी, सन्मानाची वागणूक द्यावी, शहीद जवानांच्या स्मारकांची शासन दरबार नोंद करून समाधी संवर्धनासाठी निधी द्यावा आदी. मागण्यांसाठी अपशिंगे मिलिटरी येथे रविवार, दि. 10 रोजी सैनिक निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबियांसह आजी-माजी सैनिकांच्या विविध समस्या व अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विविध समस्यांबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून भेटण्यासाठी टाळाटाळ केली जाते. त्यामुळे अनेक वर्षांपासून सैनिकांच्या समस्या प्रलंबित असून याकडे सदर मेळाव्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कदम यांनी म्हंटले.