पुरोगामी महाराष्ट्रात महिला मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नाहीत; प्रणिती शिंदेंचा महायुती सरकारला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | “महिला आणि मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, काही विकृत लोक हे चिमुरड्या मुलींनाही सोडत नाहीत. जिजाऊ, सावित्रीबाईंच्या या पुरोगामी महाराष्ट्रात महिला मानसिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नाहीत. त्यांचे जगणे मुश्कील झाले असताना गृहखाते झोप काढत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”

काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती निवडणूक निरीक्षक तथा खासदार प्रणिती शिंदे यांनी आज साताऱ्यात घेतल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुती सरकारवर निशाणा साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या की, महायुतीचे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात सुमारे 64 हजार मुली बेपत्ता आहेत. त्यावर गृहविभाग काहीच करताना दिसत नाही. निवडणूक लागली, की महायुती सरकारला लाडकी बहीण आठवली’.

जिल्ह्यात काँग्रेस विचारांचा एकच आमदार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारांची संख्या वाढावी. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत जे चित्र दिसून आले. त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे”. राज्यातील शेतकरी, महिला या महायुती सरकारला वैतागल्या आहेत.

बदलापूर, पुणे येथील घटना पाहता सध्या महिला, मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. विकृत लोक चिमुरड्यांनाही सोडत नाहीत. अशा विकृत मानसिकतेची नवरात्रोत्सवातच वध करण्याची गरज आहे. युतीचे सरकार मते विकत घेत असून, अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानही महायुतीच्या सरकारनेच केला आहे’, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला.