कराड प्रतिनिधी | स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना, आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल केला.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या डॉ. आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उमेदवार प्रशांत कदम, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. आंबेडकर म्हणाले, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी बऱ्याच ठिकाणी तोडजोडीचे उमेदवार दिलेत. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी आनंद व्यक्त करण्याऐवजी नितीन गडकरींच्या पराभवबद्दल दुःख व्यक्त केले. यावरून दोन्ही पक्षातील छुपा समझोता उघड झाला असून राज्यात काँग्रेस का लढू शकत नाही, याची कारणेही समोर येऊ लागली आहेत. दुर्दैवाने स्थानिक पक्ष आता विरोधी पक्ष होत आहे.
सातारच्या अन् कोल्हापूरच्या गादीत नेमका फरक काय?
कोल्हापूरच्या गादीला पाठिंबा दिलेल्या वंचितने साताऱ्याच्या गादीला पाठिंबा का दिला नाही? याबाबत प्रकाश आंबेडकरांना माध्यम प्रतिनिधींनी विचारण्यात आले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, साताऱ्याची गादी सिम्बॉलिक आहे. ‘दोन गाद्यांमधला फरक आहे. कोल्हापूरच्या गादीने देशाला नवीन दिशा दिली आहे. असं साताऱ्याच्या गादीचं काहीच नाही, फक्त सिम्बॉलिक आहे. शिवाजी महाराजांच्या संबंधाचा सिम्बॉलिकपणा आहे. कोल्हापूरच्या गादीने देशाची रचना आणि समाज व्यवस्था याच्यातला नवा पायंडा आणि बदल शाहू महाराजांनी केला. तो घटनेचा भागही झालेला आहे, त्यामुळे ती गादी भारताच्या नव्या रचनेमध्ये रिलिव्हन्स आहे’, असे डॉ. आंबेडकरांनी म्हंटले.