कराड प्रतिनिधी । “आयुष्यात आपल्याला पैसा कमवायचा असेल तर जे पैसे आपण कमवतोय त्याच्याशी कधीच खोटं बोलू नये. आपणं एकदा खोटं बोलू, दुसऱ्यांदा काहीतरी कारण सांगू मात्र, शेवटी आपल्याला पैशांची गरज भासतेच. त्यामुळे पैशाच्या बाबतीत आपण खूप प्रामाणिक राहायला हवं. पैसे कमवताना व्यावहारिक ज्ञान घेऊनच तो कमवावा आणि विचार करूनच खर्च करावा, असा हा गुरुमंत्र प्रसिद्ध लेखक तथा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितला.
कराड नगर पालिकेच्या नगर वाचनालयाच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण ( टाऊन हॉल) येथे आज शनिवारी 92 व्या शारदीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प पार पडले. यावेळी प्रसिद्ध लेखक तथा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची ‘गोष्ट पैशा पाण्याची’ या विषयावर बीबीसी मराठी दिल्लीचे मुक्त पत्रकार संपत मोरे यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मोरे यांनी विचारलेल्या एकूण प्रश्नांपैकी सात प्रश्नांमध्ये वानखेडे यांनी पैसा कमवण्याचा जणू गुरुमंत्रच सांगितला. यावेळी प्रशासकीय अधिकारी दिपाली सावे, लेखापाल मयुष शर्मा यांच्यासह कराडसह परिसरातील जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
वानखेडे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. गोष्ट पैसा पाण्याची याबाबत सांगायचं झालं तर पैशाशी तुम्ही कसे वागतात हे महत्वाचे आहे असे सांगत मोरे यांनी पैसा मिळवणे ही एक कला आहे का? असा पहिला प्रश्न मुलाखतीच्या सुरुवातीस मुक्त पत्रकार मोरे यांनी विचारला. त्यावर वानखेडे यांनी उत्तर देताना म्हंटले की, माझ्या आयुष्यातील पहिले शहर हे कराड आहे. आपण आज सर्वजण या ठिकाणी बसलो आहे. याला वारसा कुणाचा लाभला असेल तर तो म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा आहे. मला कराड शहराबद्दल खूप कृतज्ञ आहे. या शहराने मला घडवलं आहे.
९२ वर्षे एखादी संस्था एका विचाराने काम करते आणि लोक ही या ठिकाणी येतायत याचे कौतुक वाटते असे सांगून वानखेडे यांनी गोष्ट पैसा पाण्याची या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, पैशांच्या बाबतीत आपल्याला खूप प्रामाणिक राहायला लागते. तुम्ही एकदा खोटं बोलाल, दुसऱ्यांदा खोटं बोलाल. मात्र, पैशाच्या बाबतीत खोटं बोलूच नये. पैशाच्या गोष्टीबाबत कुणीही बोलायला लागलं तर आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो. मात्र, यावर मनमोकळेपणाने बोलून आपल्याकडे आलेला पैसा कसा वापरावा याचा विचार बारकाईने करणे गरजेचे आहे. पैशाच्या गोष्टीबाबत व्यावहारिक ज्ञान हे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच देणे आवश्यक आहे, असे वानखेडे यांनी सांगितले.
दुसरा प्रश्न मोरे यांनी केला तो म्हणजे अर्थशास्त्राचे गणित कसे चुकते? यावर अर्थशास्त्र म्हंणजे काय? याबाबत सांगताना वानखेडे यांनी थ्री इडियट या हिंदी चित्रपटाचे उदाहरण दिले या चित्रपटात जसा ‘चतुर’ नावाचा अत्यंत हुशार विद्यार्थी असतो त्याप्रमाणे आपल्याला व्हायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने तयारी करणे आवश्यक आहे. आपल्याकडे शिक्षणात कालबाह्य झालेल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. भारत देशात ज्या आयआयटी कंपन्या झाल्या आहेत. त्यामध्ये शिक्षण घेऊन तरुण परदेशात जात आहेत. त्यांनी या आपल्या देशात राहू देशाची प्रगती करणे आवश्यक आहे. कराड शहरात उत्कृष्ट शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. या ठिकाणी उत्कृष्ट विद्यार्थी घडत आहेत. या ठिकाणी शिक्षण व्यवस्था ही बदलून व्यवहारी ज्ञान देण्याची आवश्यकता आहे, असे वानखेडे यांनी उत्तर दिले.
तिसरा प्रश्न हा मोरे यांनी शेअर मार्केटबाबत सविस्तर माहिती द्याल का? असा प्रश्न विचारला. त्यावर वानखेडे म्हणाले की, शेअर मार्केटबाबत माहिती घेताना गुंतवणूक करताना पहिल्यांदा आपण अभ्यास करा हवा की आपण नक्की कोणती आणि कशाला गुंतवणूक करतोय. कर्ज काढून गुंतवणूक कधीच करू नका. गौतम बुद्ध न्हणातात की जग हे मत्सर आणि द्वेष या दोन गोष्टींवर चालते तसे शेअर मार्केट मध्ये एक अभ्यास करून आणि स्वतः च्या मनावर ताबा ठेऊन गुंतवणूक केली पाहिजे, असे उत्तर वानखेडे यांनी दिले.
चौथा प्रश्न मोरे यांनी अत्यंत महत्वाचा विचारला. तो म्हणजे आजच्या काळात शेतकऱ्याच्या तरुण मुलाची कोंडी झाली आहे. शिक्षण घेऊन भविष्यात काय करावं? कुठे जावं? हे त्याला समजेनासे झाले आहे. या प्रश्नावर उत्तर देताना वानखेडे म्हणाले की, शेतात खत, बाजारात पत आणि घरात एकमत असेल तर आपण चांगले जगतो. आपल्याला ज्या काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या नेमक्या कशाने झाल्या आहेत याचा प्रथम आपण विचार करावा आणि त्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल ते करावे. घरात जर एकत्रित कुटुंब असेल आणि दोन भाऊ असतील तर त्यातील एकाने शेती आणि दुसऱ्याने शहरात जाऊन काम करावे. मात्र, घरात एकमताने राहून कुटुंबाची प्रगती साधावी. आपण दहा ते बारा जणांनी एकत्रित येऊन व्यावसायिक शेती करणे आवश्यक आहे. बाजारात लोकांना शेतीतील काय पाहिजे याचा विचार करून तरुणांनी शेती करताना पिकवले पाहिजे आणि ते बाजार त्याला विकतही आले पाहिजे त्यासाठी त्याने धाडस, प्रामाणिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. कराड सुजलम आणि सुफलम आहे. पुढच्या २५ वर्षाचा विचार केल्यास कराड हे जागतिक दर्जाचे शहर बनू शकेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे वानखेडे यांनी म्हटले.
पाचवा प्रश्न यशवंतराव चव्हाण आणि आजचे राजकारणी यातील फरक काय? असा प्रश्न मोरे यांनी विचारला. त्यावर वानखेडे यांनी उत्तर दिले की, राजकारण हो गोष्ट तरुणांनी बाजूला ठेवावी आणि स्वतः च्या करियरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यानंतर मोरे यांनी सहावा प्रश्न विचारला, कराड, पाटण मधून एकदा तरुण जेव्हा शहरात जातो तेव्हा त्याला भाषेचा प्रश्न येतो. तरुणाच्या मनातील न्यूनगंड हा कसा काढावा? या प्रश्नावर वानखेडे म्हणाले की, न्यूनगंड हा अज्ञाना पेक्षा खूप भयंकर असतो. तो पहिल्यांदा मनातून काढून टाकावा. आपल्याकडे जर बुध्दिमत्ता असेल तर लोक आपल्याकडे आपोआप येतील. त्यामुळे बुध्दीचा वापर करा न्यूनगंड सोडून द्यावा, असे उत्तर वानखेडे यांनी दिले.
मोरे यांनी सातवा प्रश्न उपस्थित केला की, तरुण मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढत चालले आहे. त्यातून ते कधी बाहेर पडतील? यावर वानखेडे यांनी उत्तर दिले की, मोबाईल याला बाजूला केला की तुम्ही जगापासून दूर झाला समजा. नंदन लेले यांनी म्हंटले आहे की, आपण आपल्या बुध्दीचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी करावा. मोबाईलचा वापर हा कामासाठी करावा छंद म्हणून नाही, असे उत्तर वानखेडे यांनी दिले.